ऑनलाईन पेमेंटच्या खोट्या मेसेजने गंडवले
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा येथील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात विक्रेत्याला ग्राहकाने ऑनलाईन पेमेंट केले; परंतू ऑनलाईन पेमेंटला देयक रकमेच्या खोट्या मेसेजने गंडविले.ऑनलाईन पेमेंटची रक्कम मिळाली की नाही हे पाहतानाच ग्राहकांनी त्वरीत तेथून पोबारा केला. भरदिवसा व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
रेवदंडा बाजारपेठेत बुधवारी (दि. 2) दुपारी 2.45 च्या सुमारास राहूल राजेंद्र जैन यांच्या मालकीच्या राहूल इलेक्ट्रानिक्स या दुकानात एका ग्राहकांनी सॅमकॉन कंपनीचा स्पिकर सेट 7500/-रूपये किमंतीमध्ये खरेदी केला. यावेळी खरेदी केलेल्या वस्तूची रक्कम देण्यासाठी प्रथम भ्रमणध्वनीवरील स्कॅनरवर खरेदी रक्कम देण्याचा बहाणा केला. परंतू तेथे नेटवर्क मिळत नसल्याची तक्रार करून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील संगिता राजेंद जैन यांच्याकडे भ्रमणध्वनी क्रमांक मागितला. त्यानुसार त्यांनी भ्रमणध्वनीने ऑनलाईन गुगल-पे व्दारे खरेदीची 7500/-रूपये रक्कम पाठविली. त्या पाठविलेल्या रक्कमेचा मेसेजसुध्दा त्यांनी दुकानातील संगिता जैन यांना दाखविला. दरम्यान ग्राहकांनी पाठविलेली रक्कम खात्यात जमा झाली की नाही, हे तपासले. मात्र, ग्राहकांनी ऑनलाईन पाठविलेली रक्कम खात्यात जमा झाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान आर्थिक फसवणूक करणाऱ्या अज्ञाताने तेथून त्वरित बाहेर ठेवलेल्या मोटर सायकलने पोबारा केला.
या घटनेचा बोभाटा होताच, सर्वांनीच राहूल इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे धाव घेतली. दरम्यान मोटर सायकलस्वार रेवदंडा मोठे बंदरमार्गे गेला असल्याने दुकानमालक राजेंद्र जैन यांनी पाठलाग केला.परंतु, राजेंद्र जैन यांचा पाठलाग, यशस्वी झाला नाही. दरम्यान अज्ञात चोरट्यांचे छायाचित्र सीसीटीव्हीमध्ये मिळाले असून पलायन केलेल्या मोटर सायकलच्या दोन्ही नंबर प्लेट नसल्याचे दिसते. या फसवणूक करणाऱ्या अज्ञातांविरोधात दुकानदार संगिता राजेंद्र जैन यांनी रेवदंडा पोलिस ठाणे येथे आर्थिक फसवणूकीबाबत तक्रार अर्ज दिला आहे.







