आठवडे बाजारविरोधात व्यापारी एकवटले; आंदोलनात शेकडो व्यापार्यांचा सहभाग
| पनवेल | वार्ताहर |
शासन, महापालिका, ग्रामपंचायत, वीज वितरण व अन्य शासकीय संस्थांना मालमत्ता कर, इतर टॅक्स, जीएसटी व्यापार्यांनी भरायचा अन् शासन आणि महापालिकेने बेकायदा आठवडे बाजार, फिरते व्यापारी, पदपथावरील दुकानदार यांना मोकाट सोडून त्यांना संरक्षण द्यायचं. या महापालिका व शासनाच्या भूमिकेविषयी कामोठ्यामधील व्यापारी मंगळवारी सकाळपासून आक्रमक झाले होते. आठवडे बाजार कायमचे बंद करण्यासाठी त्यांनी सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व बाजारपेठ बंद ठेवून शासनाचा जाहीर निषेध केला. अखेरीस महापालिकेचे विभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी आठवडे बाजार बंद करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर व्यापार्यांनी आपला बंद सायंकाळी चार वाजता मागे घेतला.
कामोठे वसाहतीमध्ये पदपथावरील फिरते व्यापारी, पदपथाच्याच्या बाजूला लावणारे ठेले, तसेच कामोठ्यात भरणारे आठवडे बाजार यामुळे व्यापार्यांच्या व्यवसायावर मोठी कुर्हाड कोसळत असे. कोट्यवधी रुपयांचे व्यापार्यांचे व्यापारासाठी गाळे घ्यायचे किंवा लाखो रुपये भाडे भरून दुकानाचे गाळे घ्यायचे, त्यात शासनाला, महापालिकेला, महावितरणला, इन्कम टॅक्स, तसेच सर्वत्र टॅक्स भरायचा आणि त्यातून व्यवसाय करायचा. मात्र, खुलेआम रस्त्यावर पदपथावर मोकळ्या जागेवर आठवडे बाजार भरून व्यापार्यांच्या धंद्यावर पाणी फिरवायचे. आठवडे बाजार, फिरत्या व्यापार्यांनी, पदपथावरील व्यावसायिकांनी कचरा करायचा, प्लास्टिकच्या पिशव्यांच्या बेकायदा वापर करायचा, त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करते आणि कारवाई मात्र जो टॅक्स भरतोय, जीएसटी भरतोय, कर भरतोय त्यांच्यावर करायची. असा प्रकार शासन, महापालिका गेल्या अनेक वर्षापासून करत आली आहे.
मेटाकुटीस आलेल्या व्यापार्यांनी अखेरीस संघटना करून शासनाचा व महापालिकेचा निषेध करून आठवडे बाजार कायमचे बंद व्हावे यासाठी मंगळवारी सकाळपासून दुकाने बंद करून आंदोलनाचा पवित्रा व हत्यार उपासले. या आंदोलनात जवळपास कामोठातील साडेचारशे व्यापारी सहभागी झाले होते. यावेळी ‘बंद करा, बंद करा आठवडा बाजार, फेरीवाले बंद करा’च्या घोषणांनी कामोठे परिसर चांगलाच दुमदुमला. अखेरीस महापालिकेचे विभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नाना मगदूम यांची व पदाधिकार्यांची भेट घेऊन आठवडे बाजार फेरीवाले, हातगाडीवाले कायमस्वरूपी बंद करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर व्यापार्यांनी आपले दुकाने बंद आंदोलन मागे घेत सायंकाळी चार वाजता दुकाने उघडली.
महापालिकेकडून हातगाडी, पदपथावर बसणारे फेरीवाले आठवडे बाजारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. यामधून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने याकडे कोणीही फारसे गांभीर्याने पाहत नव्हते. मात्र, या आठवडे बाजार फेरीवाले हातगाड्यांमुळे करोडो रुपये खर्च करून व्यावसायिक दुकानाचे गाळे घेतलेले व लाखो रुपये भाडे भरून दुकान स्थापन केलेल्या व्यापारी पुरते मेटाकुटीला आले आहेत. अखेरीस आपला व्यवसाय वाचवायचा कसा यासाठी व्यापार्यांनी एकजूट करून महापालिका व शासनाच्या या धरसोड वृत्तीविषयी दुकान बंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर महापालिकेच्या अधिकार्यांना चांगली जागा आली. अखेरीस व्यापार्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन येत्या आठवड्याभरात पदपथावरील विक्रेते, हात गाडीवाले तसेच मोकळ्या जागेत भरणारे आठवडे बाजार कायमस्वरूपी बंद करण्याचे ठोस आश्वासन विभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी व्यापार्यांच्या शिष्टमंडळाला दिल्यानंतर व्यापार्यांनी एकच जल्लोष करून सायंकाळी चार वाजता दुकाने उघडली. जर याबाबत ठोस उपाययोजना झाली नाही तर आगामी काळात कायमस्वरूपी कामोठ्यातील बाजारपेठ बंद करून शासन आणि महापालिकेच्या धोरणाविषयी जाहीर निषेध केला जाण्याचा इशारा कामोठ्यातील व्यापारी संघटनेचे प्रमुख नाना मगदूम यांनी दिला आहे.