16 वर्षांनंतरही अग्निप्रलयाची धग

व्यापारी अद्याप नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

पोलादपूर शहरातील बाजारपेठ 25 व 26 जुलै 2005 च्या महाप्रलयातून सावरत असताना त्यानंतर 2007 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास एका विनापरवाना गॅस सिलिंडर विक्रेत्याच्या दुकानात एकामागून एक अशा 30 सिलेंडर्सचा स्फोट झाला. या आगीत अंदाजे अडीच कोटी रूपये किमतीच्या मालमत्तेची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त झाला. एकूण 24 घरे-दुकाने भस्मसात झाली. सुदैवाने महाप्रलयाप्रमाणेच या अग्निप्रलयामध्ये जीवितहानी टाळण्यात पोलादपूरकर यशस्वी झाले. यापैकी काहींनी स्वत:ला सावरले, तर काहींनी सर्वस्व गमावल्याने त्यांच्या अस्तित्वाच्या खुणाही नाहीशा झाल्या.

पोलादपूर बाजारपेठेत अग्निप्रलयापूर्वी 15 वर्षे सुधाकर शेठ हा व्यापारी विनापरवाना गॅस सिलिंडरची विक्री जादा नफा घेऊन करीत असे. गुरूवारी सायंकाळी वीज भारनियमनानंतर सुधाकर शेठ यांच्या दुकानात त्यांचा भाऊ संतोष काळूराम शेठ हा उदबत्ती पेटवित असताना अचानक एका सिलिंडरने पेट घेतला. हा सिलिंडर विझवण्यासाठी पप्या केळकर याच्यासह अनेक तरूणांनी तातडीचे प्रयत्न केले. मात्र, ते फारसे सफल ठरले नाहीत. त्यामुळे या तरूणांनी संभाव्य धोका ओळखून आजूबाजूच्या घरे व दुकानांतील माणसांना घरे सोडून बाहेर जाण्यास सांगितले. यादरम्यान, सुधाकर शेठ याच्या दुकानातील गादीने पेट घेतला आणि तेथून त्या इमारतीच्या जुन्या लाकडांनीही पेट घेतला. त्यामुळे भयभीत लोकांनी घरदारं उघड्यावर सोडून घटनास्थळापासून दूर पळण्यास सुरूवात केली. परिणामी, विनापरवाना गॅस सिलिंडर विक्रेत्याच्या दुकानात एकामागून एक अशा 30 सिलिंडर्सचा स्फोट होऊन त्या दुकानाव्यतिरिक्त दुकानांनाही झळ बसू लागली.

2005च्या महाप्रलयावेळी मारूती मंदिराच्या ज्या दुकानापर्यंत पूरस्थिती निर्माण झाली होती. 2007 साली तेथून पुढे सदगुरू मंदिरापर्यंतची बाजारपेठ या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे अडीच कोटींची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त झाला. तत्कालीन आमदार माणिक जगताप यांनी नेहमीप्रमाणे विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री निधीतून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत आणली. मात्र, ती मदत भास्कर जाधवांनी केल्याचे राजकारण काही जळीतग्रस्तांनी केले. सरकारी मदतीपूर्वी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. त्यामुळे अनेक व्यापारी सावरले आणि अनेकांना पूर्वजन्मीची पुण्याई प्राप्त झाल्याने त्यांचे फोफावणे झाले. परंतु, ज्यांचे येथे केवळ बसून व्यवसाय करणे उपजीविकेचे साधन होते. त्यांचे या भागातून कायमचे उठणे झाले.

व्यापाऱ्यांची न्यायालयात धाव
गॅस सिलिंडर स्फोटानंतर मधुकर ग. शेठ, नितीन शेठ, मिलिंद शहा, प्रशांत प्र. शेठ आणि शैलजा शेठ आदींनी 2007 पासून महाड न्यायालयामध्ये नुकसान भरपाई दाव्याची केस दाखल केली आहे. यासंदर्भात कोरोना काळामध्ये या खटल्याचे काम स्थगित राहिल्याने या खटल्याला विलंब झाला आहे. येत्या 22 फेब्रुवारीला पुढील तारीख आहे. मात्र, या खटल्याच्या निकालाला अजून किती वर्षे लागतील, याचा अंदाज येत नाही. गॅस कंपन्या आणि विमा कंपन्यांसह अनधिकृत सिलिंडर विक्रेता सुधाकर शेठ यांच्याविरूध्द हा खटला चालविला जात आहे. मात्र, आजमितीस यातील सामनेवाला यांच्यापैकी काहींचे निधन झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Exit mobile version