| रायगड | प्रतिनिधी |
पारंपरिक फेरी बोटी आता डिजिटल युगात पाऊल ठेवत आहेत. भाऊचा धक्का ते रेवस, उरण, मोरा, तसेच गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा, एलिफंटा, अलिबाग या मार्गांवरील प्रवास आता अधिक सोयीस्कर, पारदर्शक व सुरक्षित होणार आहे. ई-तिकीट खरेदी प्रणालीसह बोटीची रियल टाइम माहिती प्रवाशांना लवकरच उपलब्ध होणार आहे. सागरी महामंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबई व आसपासच्या समुद्रकिनारी असलेली गावे, छोटे बंदर आणि पर्यटनस्थळासोबत जोडणाऱ्या पारंपरिक फेरी बोटी सेवा अनेक दशकांपासून प्रवासी वाहतूक करीत आहेत. गेल्या काही वर्षांत आधुनिक वॉटर टॅक्सी आणि रो-रो सेवा सुरू झाल्या असल्या तरी स्वस्त, सोयीस्कर आणि मोठ्या प्रवासी क्षमतेमुळे पारंपरिक फेरी बोटींची लोकप्रियता अजूनही कायम आहे.
रो-रो बोटींची तिकिटे ऑनलाइन खरेदी करता येतात; मात्र वर्षानुवर्षे प्रवासी सेवा देणाऱ्या पारंपरिक फेरी बोटी प्रवासासाठी ई-तिकीट सुविधा नव्हती. आता सुमारे 150 नोंदणीकृत फेरी बोटींना नव्या डिजिटल सुविधेचा फायदा मिळणार आहे. यापूर्वी फेरी बोटचालकांना प्रत्येक तिकिटांवरील सागरी कर (नेव्ही) सागरी महामंडळाकडे जमा करावा लागत होता. ई-तिकिटिंग प्रणालीमुळे आता तिकीट रक्कम थेट सागरी महामंडळाकडे जमा होईल, तर उर्वरित रक्कम बोट मालकांकडे वर्ग केली जाईल. या प्रक्रियेवर सागरी महामंडळाचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे.
बोटींची सुरक्षितता गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटाकडे जाणाऱ्या एका लाकडी फेरी बोटीच्या अपघातानंतर समुद्री सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या पार्श्वभूमीवर फेरी बोटचालक व संचालकांनी सुरक्षिततेसाठी बोट ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्याचे निर्णय घेतले आहेत. ही प्रणाली भारतीय नौदलाकडून विकसित केली जात आहे.
या प्रणालीअंतर्गत समुद्रात कोणती बोट कुठे आहे, याची रियल टाइम माहिती सागरी महामंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्टकडे उपलब्ध राहणार आहे. यामुळे अपघात टाळणे, प्रवासी सुरक्षितता सुधारणा आणि फेरी बोटींच्या सुरक्षिततेची हमी मिळवणे शक्य होणार आहे. ही प्रणाली पारंपरिक फेरी बोटी सेवा आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरेल. प्रवाशांना तिकीट खरेदी सोपी होईल आणि बोटींची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल, असे सागरी महामंडळाचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
फेरी बोटी अपडेट होणार
ई-तिकीट प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करता येणार.
सुमारे 150 नोंदणीकृत बोटींना फायदा
थेट सागरी महामंडळाकडे पैसे जमा होणार
तिकिटावरील सागरी कर थेट जमा होणार
उर्वरित रक्कम बोट मालकांकडे जाणार.
पारदर्शकता व व्यवस्थापन सुधारणा होणार
रियल टाइम माहिती उपलब्ध असणार
सुरक्षा व सुविधा अपघात टाळण्यास मदत होणार.
फेरी बोटी सेवा आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडली जाणार
