अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दोन वर्षांपासून अस्मानी संकट, वादळ, बदलते वातावरण, पर्ससीन, एलईडी मासेमारी याचा फटका पारंपरिक मच्छीमार व्यवसायला बसला आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. आपल्या विविध प्रमुख मागण्यासाठी आज पारंपरिक मच्छीमार बांधव यांनी महाराष्ट्र कृती समितीच्या माध्यमातून अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. आपल्या विविध मागण्याचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. मागण्याचा सकरात्मक विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
पारंपरिक मच्छीमार हा गेली अनेक वर्षे समुद्रात मासेमारी करीत आहे. बदलत्या यांत्रिक युगात पर्ससीन, एलईडी सारखी विध्वंसक मासेमारी केली जात असल्याने याचा फटका पारंपरिक मासेमारीला बसला आहे. त्यातच निसर्ग, तोक्ती वादळ, अवेळी पडत असलेला पाऊस, कोरोना यामुळे पारंपरिक मच्छीमार हा मेटाकुटीस आला आहे. मात्र त्याच्या या समस्येकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाला जाग आणण्यासाठी धरणे आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. या आंदोलनप्रसंगी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे चिटणीस उल्हास वाटकरे, कार्यकारी सदस्य बळिराम नाखवा, संतोष पाटील तसेच रायगड जिल्हा मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले, बी. एन. कोळी, उपाध्यक्ष जनार्दन भगत आदी उपस्थित होते.






