बचाव कृती समितीचा विजयी मेळावा; 1630 कुटुंबियांचा यशस्वी संघर्ष
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील पारंपारिक मच्छिमारांच्या मासेमारी जमिनीत प्रवासी तसेच इतर जेट्टी बांधण्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीबाबत मच्छिमारांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयान जेएनपीटी आणि संबंधित कार्यालयांना दिले. त्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी हनुमान कोळीवाडा येथे पारंपारिक मच्छिमारांचा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. गेली 17 वर्षे हा न्यायालयीन लढा सुरु होता. या लढ्यामुळे परिसरातील 1630 कुटुंबियांना न्याय मिळाला आहे.
मोरा प्रवासी धक्का व एमएमसेझ शेवा यांच्या दरम्यानचे मासेमारी जमिनीत एमएमसेझ ने प्रवाशी व इतर धक्के बांधण्याची योजना आखली होती. त्या मासेमारी जमिनीचे भुईभाडे JNPT ला देण्याचा NMSEZ व JNPT या दोन कंपन्यात करार झाला होता. म्हणून JNPT ने NMSEZ ला प्रवाशी व इतर धक्के बांधण्याची परवानगी दिली होती. त्या वेळी पारंपारिक मच्छिमार बचाव कृती समितीने मासेमारी जमिनीचा मोबदला पारंपारिक मच्छिमारांनी जेएनपीटी प्रशासनाला मागितलेला होता. मात्र मच्छीमारांना मोबदला देण्यात आला नाही. तसेच पुनर्वसनही करण्यात आलेले नव्हते. याबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु होता. तो जिंकल्याप्रित्यर्थ हनुमान कोळीवाडा येथे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रमेश कोळी, अरुण शिवकर, नंदकुमार पवार, रामदास कोळी, प्राची कोळी, कैलास कोळी, भारत कोळी, लक्ष्मण कोळी, दिलीप कोळी, अॅड. गोपीनाथ पाटील, प्रा. गीतांजय साहू, परमानंद कोळी, सुरेश कोळी, रमेश कोळी, मंगेश कोळी, कृष्णा कोळी आदी पारंपारिक मच्छिमार बचाव कृती समितीचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी विजयी मेळाव्यात 2005 पासून ते 2022 पर्यंत कशा पद्धतीने लढा देण्यात आला याविषयी माहिती देण्यात आली. या मेळाव्यात उरण पनवेल तालुक्यातील तसेच हनुमान कोळीवाडा, उरण कोळीवाडा, बेलपाडा कोळीवाडा, गव्हाण कोळीवाडा या चार गावातील मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत रायगड जिल्हाधिकारी याना व्याजासहित रक्कम 1630 कुटुंबांना दोन महिन्यात वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाना 5 लाखाहून अधिक रक्कम नुकसान भरपाई मिळणार आहे. तर या कंपनी कडून 4 लाख रुपये असे एकूण 9 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाना मिळणार आहे. अशा प्रकारे 2005 पासून सदर मच्छिमार बांधवांनी आपला लढा सुरु केला त्यास 2022 मध्ये म्हणजे तब्बल 17 वर्षांनी यश आले. या यशाबद्दल विजयी मेळावा घेण्यात आला. त्यास उत्तम प्रतिसाद देखील मिळाला.
मच्छिमारांवर वेळोवेळी अन्याय होत असल्याने मच्छिमार बांधवांना एकत्रित करून मच्छिमार बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी, मासेमारी करणार्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी वरिष्ठ वकिलांच्या सल्ल्याने पारंपारिक मच्छिमार बचाव कृती समितीच्या पदाधिकारी सदस्यांनी व मच्छीमारांनी एकत्र येत महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनची स्थापना केली. या युनियनच्या फलकाचे अणावरण यावेळी अरुण शिवकर यांच्या हस्ते करण्यात आले.