सहलींच्या बसमुळे वाहतूक कोंडी

स्थानकात गाड्या उभ्या करण्याची मागणी

| श्रीवर्धन । वार्ताहर ।

दोन वर्ष कोरोना प्रतिबंधामुळे शाळा व महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहली रद्द करण्यात आलेल्या होत्या. यावर्षी सहलींना परवानगी मिळाल्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपासूनच श्रीवर्धन तालुक्यात सहली मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरुवात झाली. दिवसाकाठी 40 ते 50 सहलीच्या बस गाड्या येत असतात. यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सह अनेक खासगी बसेस देखील येत असतात. शहरातील सर्वच रस्ते अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे समोरासमोरून दोन मोठ्या बसेस आल्यानंतर त्या जाण्यासाठी खूप मोठा वेळ लागतो. पर्यायाने शहरात वाहतूक कोंडी होत असते.

पोलिसांनी दुचाकी स्वरांना दुचाकी बाजूला उभ्या करण्याची शिस्त लावली असली तरीही एकापाठोपाठ चार ते पाच सहलीच्या बस आल्यानंतर श्रीवर्धनवासियांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सहलीच्या येणार्‍या बसेसना परिवहन स्थानकातच उभ्या करून विद्यार्थ्यांना पायी समुद्रकिनार्‍यापर्यंत येण्यासाठी पर्याय द्यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version