पालीच्या बाह्यवळणाला मुहूर्त कधी?

वाहतूक कोंडीमुळे जनतेतून संताप
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात वाहतूक कोंडी जटिल झाली आहे. पालीच्या बाह्यवळण मार्गाला (बायपास) काही वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही या मार्गाला तयार होण्यास अजून काही मुहूर्त सापडलेला नाही. बाह्यवळण मार्ग झाल्यास येथील वाहतूक कोंडीची समस्या बहुतांशी सुटेल.

येथील बल्लाळेश्‍वर मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक, मारुती मंदिर, बाजारपेठ, हाटाळेश्‍वर चौक, मारुती मंदिर अशा बहुतांश ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. असंख्य कारणांमुळे पोलिसांना या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बाह्यवळण (बायपास) मार्ग लवकर करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून वारंवार होत आहे.

बाह्यवळण मार्ग
राज्य शासनाने सन 2010 साली या रस्त्याला मान्यता दिली आहे. तसेच त्यावेळी रस्त्यास 18 कोटी तर भूसंपादनासाठी 10 कोटींची मंजुरी मिळाली होती. सदरचा मार्ग वाकण-पाली- खोपोली राज्य महामार्ग 548(ए) व पाली पाटणूस राज्यमार्ग 94 ला जोडला आहे.

कोंडी सुटेल
पाली गावातील रस्ते रुंदिकरण होणे अवघड आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाह्यवळण रस्ता काढणे हा एकमेव पर्याय आहे. बाह्यवळण मार्ग लवकर सुरु व्हावा यासाठी फारसे कोणी पाठपुरावा करतांना दिसत नाही. बाह्यवळण मार्ग झाल्यास मोठ्या गाड्या पालीत येणारच नाहीत. त्यामूळे बरीचशी वाहतूक कोंडी कमी होईल. बलाप गावावरुन थेट बल्लाळेश्‍वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावाजवळ बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी देखिल मिळाली आहे. परंतू हा पर्यायी मार्ग अजूनही लालफितीत अडकला आहे.

शेतकर्‍यांचा विरोध
बाह्यवळण मार्गात दुबार पिके शेतजमिनी उद्ध्वस्त होणार असल्याने बाधित शेतकर्‍यांना संताप व्यक्त केला. मागील वर्षी याच महिन्यात स्थानिक बाधित शेतकर्‍यांनी मोजणीसाठी आलेल्या भूमिअभिलेख कर्मचारी व अधिकार्‍यांना परत पाठवले. विकासाच्या नावाखाली शेतकरी देशोधडीला लागणार असेल तर प्राण गेले तरी चालेल आम्ही मागे हटणार नाही, असा संताप शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केला. आम्हाला विश्‍वासात घेतल्याखेरीज भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया करू नये अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.

बाह्यवळण मार्ग झाल्यास पाली शहरातील वाहतूक सुरळीत होईल. शिवाय अवजड वाहतूक शहराबाहेरून होईल. याबरोबरच पर्यटन, रोजगार व विकासाच्या नव्या वाटा निर्माण होतील. बाह्यवळण मार्गासंदर्भात सद्यःस्थितीत काय परिस्थिती आहे हे समजू शकलेले नाही. मात्र, संबंधित विभाग व अधिकारी यांच्याकडून याबाबत माहिती मिळवू. मात्र, होऊ घातलेल्या विकासाचा बाधित शेतकर्‍यांना योग्य मोबदला व न्याय मिळणेदेखील गरजेचे आहे.

आरिफ मणियार, प्रभारी नगराध्यक्ष, नगरपंचायत, पाली

बाह्यवळण मार्गाला मंजुरी मिळाली आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमिअभिलेख (टीएलआर) कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यांची मान्यता आल्यावर पुढील प्रक्रिया सुरू होईल.

संजय विचले, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाली-अलिबाग
Exit mobile version