नागरिकांसह चालकांमध्ये नाराजी, वर्षभर भाविकांची गर्दी
| पाली । वार्ताहर ।
अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात वाहतूक कोंडी जटिल झाली आहे. पालीच्या बाह्यवळण मार्गाला (बायपास) काही वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे, मात्र अद्याप काम सुरू करण्यास मुहूर्त न मिळाल्याने नागरिकांसह चालकांमध्ये नाराजी आहे. पाली शहरात वर्षभर भाविकांची गर्दी असते. त्यात गौरी-गणपती, माघी गणेशोत्सव, दिवाळी-उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरदिवशी हजारोंच्या संख्येने भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होतात. तालुक्याचे ठिकाण असल्याने कामानिमित्त येणारे, विद्यार्थ्यांचीही मोठी वर्दळ असते. त्यातच शहरातील अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, अवैध पार्किंग व अनधिकृत बांधकामांमुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडी होते. परिणामी वाहनचालक, भाविक, पादचार्यांची गैरसोय नित्याचीच ठरली आहे.
बल्लाळेश्वर मंदिर, ग. बा. वडेर विद्यालय, जुना एस. टी. थांबा, गांधी चौक, मारुती मंदिर, बाजारपेठ, हाटाळेश्वर चौक, मारुती मंदिर अशा बहुतांश ठिकाणी नियमित कोंडी होते. वाहतूक पोलीस तैनात असले तरी कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांची चांगलीच दमछाक होते.
कोंडी सुटेल
पाली शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाह्यवळण मार्ग लवकरात लवकर तयार करणे, हा एकमेव पर्याय आहे. असे झाल्यास अवजड वाहने शहरात दाखल होणार नाहीत. परिणामी वाहतूक कोंडी कमी होईल. बलाप गावावरून थेट बल्लाळेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावाजवळ बाह्यवळण मार्ग निघेल.
बाह्यवळण मार्ग झाल्यास, पाली शहरातील वाहतूक सुरळीत होईल. शिवाय अवजड वाहतूक शहराबाहेरून होईल. याबरोबरच पर्यटन, रोजगार व विकासाच्या नव्या वाटा निर्माण होतील. बाह्यवळण मार्गाच्या कामाल अद्याप मुहूर्त लागलेला नाही. याबाबत संबंधित विभाग व अधिकार्यांकडे विचारणा सुरू आहे. होऊ घातलेल्या विकासामुळे बाधित शेतकर्यांना योग्य मोबदला व न्याय मिळणे गरजेचे आहे. – आरिफ मणियार, प्रभारी नगराध्यक्ष, नगरपंचायत, पाली