अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न; सर्व विभागांचा राहणार सहभाग
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवरील अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शुन्य मृत्यूसाठी पंचसुत्री धोरण राबविले जाणार आहे. यामध्ये अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांसह सर्व विभागाचा सहभाग राहणार आहे. त्यामुळे मृत्यू शुन्यसाठी पंचसुत्री धोरण वरदान ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरत असताना औद्योगिकीरणाच्या दृष्टीनेही नावारुपाला आहे. अलिबागसह नागाव, काशीद, किहीम, रेवदंडा, आक्षी, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर अशा अनेक समुद्रकिनाऱ्यांना पर्यटक आवर्जून भेटी देत असतात. शनिवार-रविवारी व इतर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची प्रचंड वर्दळ निर्माण होते. अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. जिल्ह्यात वर्षाला 25 हजारहून अधिक दुचाकी खरेदी केल्या जातात.त्यामुळे दुचाकींची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यात रेंटवर बाईक देण्याचा क्रेझ देखील प्रचंड वाढला आहे. दुचाकी चालवित असताना वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जातात. त्यामुळे अनेक वेळा अपघात होतात. रायगड जिल्ह्यात मागील 26 महिन्यांत रस्ते अपघातामध्ये 236 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात बहुतांशी मृत्यू हे विना हेल्मेटमुळे झाले असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून उपलब्ध झाली आहे.
त्यामुळे अपघात रोखण्यासह मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांसह अन्य विभागाची आता मदत घेतली जाणार आहे. 2025 पेक्षा प्राणांकित अपघाताचे प्रमाण 10 टक्क्यांनी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीतून वेगवेगळ्या विभागातील अधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला. स्पीड लिमीटचे बोर्ड लावणे, विजेची व्यवस्था करणे. 50 ते 100 मीटर अगोदर अपघात प्रवणक्षेत्र ठिकाणी आहे, वाहने सावकाश चालवा असे सुचनात्मक फलक लावणे. पंधरा दिवसांत उपाययोजना करून अहलाल सादर करण्याच्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. अन्यथा संबंधित अधिकारी यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी बैठक घेतली जाईल. या बैठकीतून आढावा घेतला जाणार आहे.
जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी शुन्य मृत्यूसाठी पोलीसांच्या मदतीला अन्य विभागदेखील कार्यरत असणार आहे. त्यासाठी पाच सुत्र हाती घेण्यात आली आहेत. अभियांत्रिकी, अंमलबजावणी, आपत्कालीन आघात काळजी, शिक्षण व नागरी सहभाग, डेटा, नियम, निधी व्यवस्थापन यावर काम करून मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.







