पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
। तळा । वार्ताहर।
तळा बाजारपेठेत दिवसेंदिवस अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. बाजारपेठेत खाजगी वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. मात्र, याकडे तळा पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे पहायला मिळत आहे. तळा शहरातील बाजारपेठ ही अगदी लहान असून बाजारात येणारे नागरिक आपली दुचाकी व चारचाकी कोठेही पार्क करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार हा बसस्थानक शेजारी असल्याने तालुक्याबाहेरील वाहने बसस्थानकात लावली जातात.
यामुळे एसटी लावण्यास चालकाला अडचण निर्माण होते त्यामुळे चालक एसटी बाहेरच लावत असल्याने परिणामी मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. त्यामुळे तळा पोलीस प्रशासनाने अशा अवैधरित्या पार्क केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. अशी मागणी करण्यात येत आहे.