ठेकेदाराचा काम संथगतीने सुरू; मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
| मुरूड | प्रतिनिधी |
मुरूड शहरात सध्या जोरदार विकासकामांचा धूमधडाका लावला आहे. मुख्य बाजारपेठ ते एकदरा पुलापर्यंत रस्ते खोदून ठेवल्याने बाजारपेठेत नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेले कित्येक दिवस रस्ते खोदून ठेवून काम संथगतीने सुरू आहे. या ठेकेदाराडे मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना व व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
मुरूड बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी ठेकेदार रस्ते खोदून ठेवत आहे. अनेक दिवस हे खोदलेले रस्ते तसेच आहेत. दरम्यान, या खड्ड्यात जलवाहिनी टाकून ताबडतोब बुजविण्याची गरज आहे. तरी संबंधित ठेकेदारार संथगतीने काम करीत आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशी, नागरिक व व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार कोलमडले असून, प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुरूड बाजारपेठेत श्रीराम पतसंस्थेपासून एकदरा पुलापर्यंत नाले बनविण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना धुळीशी सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर माती खडी पसरल्याने अनेकदा दुचाकीस्वार दुचाकींना अपघात होऊन जखमी झाले आहेत. तरीसुद्धा या कामात मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. तरी लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.