सर्वसामान्य नागरिक बेजार
| उरण | वार्ताहर |
उरण शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा त्रास हा नाहक सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात अनेक वेळा उपाययोजना करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा संबंधितांकडून देण्यात आला. परंतु, आजतागायत कोणत्याही प्रकारचे आंदोलन उभारण्यात आले नाही.त्यामुळे उरणकरांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे.
वाढत्या औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यामुळे उरण शहराची लोकसंख्या जवळपास पन्नास हजारांच्या घरात गेली असून, प्रत्येकाच्या घरी दोन-चार दुचाकी आणि एक चारचाकी वाहन झाले आहे. त्यामानाने शहरातील रस्त्यांची संख्या वाढली नाही. त्यातच संथ गतीने सुरू असलेला बायपास रस्त्याचे काम, राजपाल नाका, आपणा बाजार, पालवी रुग्णालय या महत्त्वाच्या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करण्यात येणारी वाहने, उरण नगर परिषद, वाहतूक पोलीस तसेच संबंधित प्रशासनात समन्वयाचा अभाव त्यामुळे शहरातील रस्त्यांचे काही अंशी रुंदीकरण व काँक्रिटीकरण होऊन ही गेल्या दोन-चार वर्षात वाहतुकीची कोंडी वाढत चालली आहे. तरी गणेशोत्सवापूर्वी उरण शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी उरणचे लोकप्रतिनिधी, उरण नगर परिषद, वाहतूक पोलीस, संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जेष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.