प्रवाशांचे हाल
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी (दि.3) सायंकाळी अत्यंत ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई जाणारी वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. जवळजवळ 20 तासांपासून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
या कोंडीत हजारो प्रवासी अडकले आहेत. या वाहतूक कोंडीदरम्यान, महिला आणि मुलांसह प्रवाशांना अन्न, पाणी आणि शौचालयाच्या सुविधांपासून वंचित राहावे लागले. महामार्ग वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना सामान्य वाहतूक पूर्ववत होईपर्यंत महामार्गावरून प्रवास करणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
टँकरमधून सतत गॅस गळती होत असल्याने सामान्य वाहतूक पूर्ववत होऊ शकली नाही. परिणामी, पुण्याकडे जाणाऱ्यांसह इतरही वाहतूक अडकली होती. मार्गांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या मोठ्या जाममुळे वाहनचालकांना मोठा फटका बसला आणि अनेक प्रवासी यात अडकून पडल्याचे महामार्ग नियंत्रण कक्षाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
वाहतूक मार्गात बदल
प्रवाशांनी ताम्हिणी घाट मार्गाने पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)
माळशेज घाट मार्गाने पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त)
या पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच, लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.







