एक्स्प्रेस वेवर वाहतुकीचा खोळंबा

सलग सुट्ट्यांचा फटका; बोरघाट जाम, प्रवाशांचे हाल

| खोपोली | प्रतिनिधी |

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी सकाळपासून वाहनांच्या वेगाला अक्षरशः ब्रेक लागला असून, प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सलग सुट्ट्यांमुळे पुण्याकडे निघालेल्या वाहनांच्या लोंढ्याने खालापूर टोलनाक्यावर पुणे लेनमध्ये अनेक तास लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कोंडी वाढताच अनेक वाहनचालकांनी एक्स्प्रेसवे सोडून जुना मुंबई-पुणे महामार्ग गाठला. मात्र, यामुळे पेण-खोपोली मार्गावरील साजगाव फाटा, शिळफाटा परिसरातही भीषण वाहतूक कोंडी झाली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की बोरघाटात वाहनांच्या रांगा लागून अनेक वाहने बंद पडली आणि अख्खा घाटच जाम झाला.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे मुंबई महानगर व उपनगरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर पुणे आणि लोणावळ्याकडे रवाना झाले आहेत. याचा थेट परिणाम मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दिसून येत आहे.

खंडाळा घाट परिसरात वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असून, अनेक ठिकाणी चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहने अडकून पडली आहेत. नेहमी दोन ते अडीच तासांत पूर्ण होणारा प्रवास अनेक प्रवाशांना चार ते पाच तासांहून अधिक वेळ घेत आहे. वाहनांत अडकलेल्या प्रवाशांना तीव्र उष्णता, तहान आणि प्रचंड थकव्याचा सामना करावा लागत असून, अनेकांचा संयम सुटताना दिसत आहे.

महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असले तरी वाहनांची संख्या प्रचंड असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणणे अवघड झाले आहे. प्रवाशांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि पर्यायी मार्गांचा विचार करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


मुंबई-गोवा महामार्गावरही कोंडी

| महाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली कामे आणि सलग सुट्ट्यांमुळे निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीचा फटका थेट भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनाही बसला. रायगड जिल्ह्यातील इंदापूर परिसरात ते तब्बल अडीच तास वाहतूक कोंडीत अडकले.

कोंडीचा अनुभव घेतल्यानंतर आमदार दरेकरांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं, “ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. रोज या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा त्रास आज मला प्रत्यक्ष जाणवला.”

याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ एसएमएस करून परिस्थितीची माहिती दिली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं सांगितलं. महामार्गाचं काम लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान, सततच्या वाहतूक कोंडीमुळे चाकरमानी, पर्यटक आणि स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त असून, प्रशासनावर तातडीच्या निर्णयांचा दबाव वाढत आहे.

Exit mobile version