महामार्गावर प्रवाशांची कोंडी

वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रचंड उकाड्याने हैराण

| कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोलाड-इंदापूर व माणगाव दरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी ही निर्माण होत असून, यामुळे प्रवाशांचा खोळंबा होताना दिसत आहे. यामुळे वाहने तासन्तास उभी करावी लागत असून, प्रवाशांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

शनिवार व रविवार नोकरदारांना असणार्‍या सुट्ट्या व शालेय विद्यार्थ्यांना शाळेला पडलेल्या सुट्ट्या, तसेच सुरु झालेली लग्नसराई यामुळे महामार्गावर येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची संख्या वाढली आहे. परंतु कोलाड, इंदापूर व माणगावमधील रस्त्याचे काम पंधरा वर्षांपासून अर्धवट स्थितीत असून, अद्यापही या कामात प्रगती नाही. या दोन्ही बाजारपेठेतील रस्ता अरुंद असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

किती ठेकेदार आले किती गेले? रस्त्याचे काम काय मार्गी लागत नाही. महामार्ग पूर्ण होण्यासाठी लोकनेत्याकडून फक्त तारीख पे तारीख; परंतु महामार्गाच्या कामात कोणतीही प्रगती नाही. यामध्ये ठेकेदारावर प्रशासनाचा नसलेला वचक यामुळे फक्त मनमानी सुरु आहे. रोज मरे त्याला कोण रडे! अशीच परिस्थिती असून, यामुळे नाहक बळी जात आहे व अनेकांचे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न प्रवासीवर्गातून केला जात आहे.

Exit mobile version