पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

महाराष्ट्रातील प्रख्यात धार्मिक व अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत बिकट झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेला बाह्यवळण मार्ग (बायपास) अद्याप पूर्ण न झाल्याने भाविक, पर्यटक, प्रवासी आणि स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अरुंद रस्त्यातून अवजड वाहने काढताना चालकांची मोठी कसरत होत असून, या कोंडीमुळे शहराचा श्वास गुदमरत आहे.

पाली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. शहरातील बल्लाळेश्वर मंदिर परिसर, ग. बा. वडेर हायस्कूल, जुने एस.टी. स्टँड, गांधी चौक आणि बाजारपेठ यांसारख्या अरुंद रस्त्यांवर नियमित कोंडी होते. डबर व खडी वाहतूक करणारे अवजड डंपर, नियमांचे उल्लंघन करून होणारी दुहेरी वाहतूक आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली अवैध पार्किंग यामुळे ही समस्या अधिकच जटील झाली आहे. अनेकदा महत्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात नसल्याने कोंडीत भर पडते, ज्याचा फटका रुग्णवाहिकांनाही बसत आहे. काही दिवसांपूर्वीच वाहतूक कोंडीत अडकलेले असताना एका डंपरमुळे ग्रामविकास अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटनाही येथे घडली आहे.

वाहतुकीचा अतिरिक्त ताण
मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडी व संथ गतीने सुरू असलेले काम यामुळे मुंबईकडून कोकणात जाणारी आणि कोकणातून पुण्या-मुंबईकडे येणारी बहुतांश वाहतूक पालीमार्गे वळवली जाते. यामुळे तीर्थक्षेत्रातील मूळ वाहतुकीत बाहेरच्या वाहनांची मोठी भर पडत आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यास ही वाहने तसेच अवजड वाहने शहराबाहेरून जातील आणि पालीचा रस्ता मोकळा होईल.
15 वर्षांपासूनचा वनवास
पालीतील कोंडीवर रामबाण उपाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाह्यवळण मार्गाला मंजुरी मिळून 15 वर्षे उलटली आहेत. वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग 548 (ए) ला पाली-पाटणूस मार्गाशी जोडणारा हा रस्ता बलाप गावावरून थेट बल्लाळेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावापर्यंत जाणार आहे. यासाठी 18 कोटी रुपये रस्त्यासाठी आणि 10 कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर आहेत. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे आणि जमिनीचा मोबदला योग्य न मिळाल्याने शेतकऱ्यांचा विरोध असल्याने हे काम अद्याप कागदावरच आहे.

पालीतील महाकाली मंदिर चौक, छत्रपती संभाजीमहाराज चौक असे काही महत्त्वाचे रस्ते रुंदीकरण करण्यात आले आहे. तर ग. बा. वडेर हायस्कुल व बाजारपेठेत आदी ठिकाणचे रस्त्यावर आलेली बांधकामे मागे घेतली आहेत. आणि रस्ते मोकळे केले आहेत. सर्व मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन तसेच सर्व तांत्रिक अडचणी सोडवून बाह्यवळण मार्ग केल्यास पालीतील वाहतूक कोंडी कमी होईल. वाहन चालकांनी देखील नियमांचे पालन करावे.

-सुलतान बेनसेकर,
उपनगराध्यक्ष, पाली

पालीतील अरुंद रस्ते, अतिक्रमणे, दुतर्फा पार्क केलेली वाहने व नियमांचे उल्लंघण करणारे वाहन चालक आणि महत्त्वाचे म्हणजे सतत होणारी अवजड वाहतूक यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. पोलिसांनी योग्य प्रकारे वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. नगरपंचायत ने रस्त्यावर आलेली अनधिकृत बांधकामे तोडली पाहिजेत. शिवाय बाह्यवळण मार्ग झाल्यास वाहने थेट शहरा बाहेरून जातील आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न आपोआप मार्गी लागेल.

-कपिल पाटील,
सामाजिक कार्यकर्ते, पाली

Exit mobile version