नववर्षाच्या उत्साहात वाहतूक कोंडीचे विघ्न

| माणगाव | प्रतिनिधी |

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकण किनारपट्टीकडे जाणाऱ्या पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी उसळल्याने मुंबई-गोवा महामार्गासह माणगाव-पुणे मार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. थर्टी फर्स्ट, शनिवार -रविवारची सलग सुट्टी आणि हॉटेल्स, होमस्टे हाऊसफुल्ल झाल्यामुळे पहाटेपासूनच महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणाकडे दाखल होत आहेत. परिणामी मुंबई -गोवा महामार्गावरील इंदापूर, माणगाव, कोलाड, नागोठणे परिसरात तसेच माणगाव पुणे मार्गावर अनेक ठिकाणी संथगतीने वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

माणगावपासून मुंबई बाजूकडे व महाड बाजूकडे सुमारे पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या, नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडात पर्यटकांचा महापूर लोटला होता. त्यामुळे महामार्ग जाम झाल्याने खाजगी वाहनातील तसेच महामंडळाच्या बसमधील प्रवासी नागरिकांचे पाणी, नाश्ता, जेवण व प्रसादनगृहासाठी प्रचंड हाल झाले. सकाळपासून लागलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी माणगाव पोलीस, महामार्ग पोलीस व वाहतूक शाखेचे अधिकारी-कर्मचारी दिवसभर रस्त्यावर तैनात होते. मात्र, वाहनांची संख्या क्षमतेपेक्षा अनेक पटीने वाढल्याने ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. अवजड वाहने, खासगी बस, पर्यटकांच्या चारचाकी गाड्या आणि दुचाकी यांची सरमिसळ यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे. पुढील चार दिवस मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ताणातच राहण्याची शक्यता असून प्रवाशांनी प्रवासाचे योग्य नियोजन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्यथा थर्टी फर्स्टचा आनंद प्रवाशांसाठी वाहतूक कोंडीच्या त्रासातच अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version