विद्यार्थी, चाकरमानी आणि कामगारांचा खोळंबा; तिनविरा-कार्लेखिंड मार्गावर मोठी कोंडी
|रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-पेण मार्गावर मंगळवारी सकाळी महाकाय बॉयलर वाहून नेणाऱ्या ट्रेलरमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. तिनविरा ते कार्लेखिंड दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने शाळकरी विद्यार्थी, चाकरमानी आणि कामगारांना मनस्ताप सहन करावा लागला. सकाळच्या गर्दीच्या वेळेत झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे अनेकांचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये सुरू होऊन आठवडा उलटला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 3 जुलैपर्यंत सकाळच्या सत्रात वर्ग सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी लवकर घराबाहेर पडावे लागत आहे. अशातच मंगळवारी (दि. 23) शाळा आणि कामाच्या ठिकाणी पोहोचण्याच्या घाईत असलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील युरिया प्रकल्पाचे काम सुरू असून, त्यासाठी लागणारे अवजड साहित्य आणण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले तीन महाकाय बॉयलर ट्रेलरच्या सहाय्याने आणले जात आहेत. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बॉयलर घेऊन जाणारे ट्रेलर तिनविरा मार्गे पुढे जात होते. मात्र, तिनविरा ते कार्लेखिंड हा मार्ग अरुंद असल्याने इतक्या मोठ्या आकाराच्या बॉयलरची वाहतूक करताना चालकांना मोठी कसरत करावी लागली. परिणामी, या मार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला आणि काही काळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. याचा परिणाम शाळा-महाविद्यालयांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते कार्यालयीन कर्मचारी आणि कामगारांपर्यंत सर्वांवर झाला. अनेकांना वेळेत शाळा, महाविद्यालये आणि कामाच्या ठिकाणी पोहोचणे शक्य झाले नाही.
दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती हाताळली. पोलिसांनी वाहतूक नियोजन करत कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली असली तरी सकाळच्या गर्दीच्या वेळेत झालेल्या या अडथळ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
