उरण चारफाटा चौकात वाहतूक कोंडी

वाहने दोन दोनच्या रांगेने उभी, अरुंद रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

| उरण । वार्ताहर ।

शहर आणि ओएनजीसी प्रकल्पाला जोडणार्‍या रस्त्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने ही कोंडी दूर करण्यासाठी सिडकोने या रस्त्याचे रुंदीकरण केले असले तरी सध्या या चौकात खासगी टॅक्सी, रिक्षा व इतर वाहने दोन दोनच्या रांगेने उभी केली जात आहेत. त्यामुळे रुंदीकरण करण्यात आलेल्या चौकात पुन्हा एकदा येथील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याचा त्रास उरणमध्ये ये जा करणार्‍या वाहनचालक व नागरिकांना सहन करावा लागत आहे.

शहर, ओएनजीसी, करंजा बंदर तसेच पनवेलकडे जाणारा मार्ग या रस्त्याचा चारफाटा तयार झाला आहे. त्याचप्रमाणे याच चौका शेजारी एसटी बसस्थानक आणि सध्या एनएमएमटीचेही स्थानक आहे. मात्र चौकातील रस्ते अरुंद असल्याने उरणच्या नागरिकांना दररोजच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. सुट्टीच्या दिवशी पिरवाडी किनार्‍यावर चारचाकी वाहनाने येणार्‍या पर्यटकांमुळे प्रचंड कोंडीचा सामना करावा लागत होता. या चौकाचे रुंदीकरण करण्यासाठी सिडकोने येथील बेकायदा असलेली झोपडपट्टी हटवली आहे. यानंतर या चौकाच्या सुशोभीकरण करण्यासाठी येथील रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. त्यामुळे उरणच्या चारफाटा वरील कोंडीतून उरणमधील नागरिकांची सुटका झाली होती.

मात्र ही व्यवस्था तात्पुरती ठरली असून वाढीव रस्त्यात दुचाकींचे वाहनतळ, चौकातच उभी करण्यात येणारी खाजगी प्रवासी वाहने, रिक्षा त्याचप्रमाणे थांबा नसतांनाही उभी केली जाणारी एसटी व एनएमएमटी बसेस यामुळे सध्या येथील नागरिकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शहराला जोडणार्‍या या चौकातील बेकायदा उभ्या केल्या जाणार्‍या वाहनांवर कारवाई करून कोंडी दूर करण्याची मागणी चाणजे येथील नागरिक निरंजन राऊत यांनी केली आहे.

Exit mobile version