। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात वाहतूक कोंडीची समस्या जटिल झाली आहे. अरुंद रस्ते, नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक, अवजड आणि डंपर वाहतूक यामुळे वाहतूक कोंडी सोडविणे अवघड झाले आहे. शिवाय, मागील 10-12 वर्षांपासून बाह्यवळण मार्ग अडचणीत अडकला असल्याने वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना होऊ शकलेली नाही. नागरिक, खरेदीसाठी बाजारात येत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका सर्वार्नां बसतोय. शिवाय, बल्लाळेश्वर दर्शनासाठीदेखील भाविक भक्त संख्या वाढली आहे.
दर्शनासाठी येणारे भाविक व पर्यटकांची वाहने, तसेच इतर अवजड वाहने यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. दिवसा आणि रात्रीदेखील कोंडी होत असते. परिणामी, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त व विद्यार्थी शाळा व कॉलेजमध्ये येत असतात. परिणामी कोंडीमुळे वाहनचालक, भाविक, पादचारी व विद्यार्थ्यांची येथून वाट काढताना मोठी गैरसोय होते. शिवाय दुर्घटना घडण्याची शक्यतादेखील आहे. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोंडीची करणे
पालीत डंपर, ट्रॅक्टर व लक्झरी वाहनांची नियमीत ये-जा सुरू असते. यामुळे बाजूने वाहनांना येण्या-जाण्याचा मार्ग मिळत नाही. तसेच नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालकदेखील वाहतूक कोंडीत भर घालतात. पालीतील रस्ते हे खूप अरूंद आहे. अशा अरुंद रस्त्याच्या दुतर्फा अनेकजण आपली दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करतात व खरेदी किंवा इतर कामासाठी जातात. अनेक दुकाने, टपरर्या व इमारती रस्त्याच्या अगदी कडेला आहेत. काही ठिकाणी तर अनधिकृत बांधकामे देखील बांधली गेली आहेत. बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडलेले असते यामूळे येथून मार्ग काढणे वाहनचालकांना शक्य होत नाही. यामुळेदेखील पालीत सतत वाहतूक कोंडी होत असते.
वाहन चालकांनी नियमांचे पालन केल्यास वाहतूक सुरळीत होईल. पालीत नो इन्ट्री, नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी आपली वाहने मोकळ्या जागेत पार्क केल्यास शहरात वाहतूक कोंडी होणार नाही.
आरिफ मणियार, उपनगराध्यक्ष, पाली
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व अवजड वाहतूक नियंत्रित करण्यासाठी योग्य उपाययोजना केली जाणार आहे.
दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड