| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथे सध्या सौरऊर्जेवर चालणारे डेकोरेटिव्ह स्मार्ट स्ट्रीट लाईट पोल व हाय मास्ट बसवण्याचे काम सुरू आहे. घाईघाईत काम उरकण्यात मग्न असलेल्या कंत्राटदाराने खांबासाठी पाया करताना अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी न बघता रस्त्याच्या कडेला खांबाचा पाया उभारला आहे. आधीच अरूंद रस्ते त्यातच खांब यामुळे वाहतूक कोंडीत आणखीन भर पडणार आहे.
श्रीवर्धन शहराला सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण पूरक आणि आधुनिक रोषणाई तसेच श्रीवर्धनच्या शहरी दृश्य सौंदर्याला नवे परिमाण देणारे असे सहा मीटर उंचीचे 150 डेकोरेटिव्ह खांब आणि 12.5 मीटर उंचीचे 12 हाय मास्ट बसवण्याचे काम भर पावसाळी दिवसात अनेक ठिकाणी सुरू आहे. बहुतांश ठिकाणी रस्त्यालगत चे पिचींग फोडीत त्यावर खांबाचा पाया बांधलाय तर काही ठिकाणी अरूंद मार्गावर रस्ता व पिचींगच्या मधोमध खांबा साठी पाया उभा केला आहे. भविष्यात या खांबा मुळे अरूंद रस्त्यावर वाहतूक कोंडीत आणखीन भर पडणार आहे. गेले दोन दिवस शहरात बांधलेल्या पायांवर डेकोरेटिव्ह पथदिव्यांचे खांब उभे केले जात आहेत. यात अनेक खांब बागायती झाडांच्या फांद्या मध्ये गुरफटले गेलेत. नगरपरिषदेच्या पथदिव्यांच्या खांबासमोरच डेकोरेटिव्ह पथदिवे उभारण्यात येत आहेत. याचे नक्की नियोजन काय असावे असा संभ्रम नागरिकांना झाला आहे.







