वाहतूक पोलिसांचा पत्ता नाही
| रसायनी | वार्ताहर |
जुना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी (दि.9) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चौक हद्दीत मोठा कंटेनर अडकल्याने वाहतूक कोंडी झाली. या मार्गावर सतत वेगवेगळ्या गाडीतून फेरफटका मारणारे वाहतूक पोलीस दिसून न आल्याने प्रवासी नागरिकही संतापले होते.
जुना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ग्रामपंचायत वावंढळ हद्दीत मुंबई लेनवर हॉटेल अरुण येथे कांढरोली गावात जाण्यास पनवेल-खोपोली रस्त्याला मार्गिका आहे. पनवेल-खोपोली व खोपोली-पनवेल हे रस्ते एकमेकांना समांतर असले तरी अतिशय खाली-वर आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबलेल्या मोठ्या गाड्या पुन्हा खोपोलीकडे मार्गस्थ होताना पनवेल-खोपोली हा रस्ता उंच असल्याने मोठ्या गाड्या वळताना रस्त्याच्या मध्येच अडकून थांबतात. हे अनेक वेळा झाले असून, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एम्एच/46/ सीयू हा लांब कंटेनर खोपोली दिशेला जात असताना वळण घेताना त्याची मागची बाजू उंच रस्त्याला अडकून पडली आणि मागची चाके हवेत राहिल्याने कंटेनर रस्त्यात अडवा झाला. दरम्यान, खोपोलीकडे जाणारी वाहतूक कोंडी झाली, तर काही गाड्यांनी खोपोलीकडे जाण्यास धोका पत्करून खोपोली पनवेल लेनवर उतरली. त्यामुळे दोन्ही रस्त्यांवर कोंडी झाली. मुळात, हे वळण आणि मार्गिका अतिशय धोकादायक आहेत. विशेष म्हणजे, या रस्त्यावरून वेगवेगळ्या खासगी गाडीतून वाहतूक पोलीस गस्त घालत असतात, मात्र अशा वेळी ते कुठे दिसत नाही. या रस्त्याची असणारी कमी-जास्त उंची याकडे या रस्त्याची मालकी असणार्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.