| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेड्यावाकड्या उभ्या करण्यात येत असलेल्या दुचाकींमुळे वाहतूक कोंडीच्या प्रमाणामध्ये भर पडत असते. तर, श्रीवर्धनमध्ये येणाऱ्या पर्यटकांची वाहने देखील बेशिस्तपणे रस्त्यात उभी करत असतात. रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करून मॅप बघून कुठल्या रस्त्याने जायचे हे विचार करून ठरवत असतात. त्यामुळे एका गाडीच्या मागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अगोदरच शहरातील रस्ते अरुंद आहेत. श्रीवर्धनमधील तीन चाकी रिक्षावाले देखील अनेक ठिकाणी रिक्षा स्टँड नसताना आपल्या रिक्षा उभ्या करत असतात. तर शहरातून जाणाऱ्या सहा आसनी रिक्षा प्रवासी घेण्यासाठी जागोजाग उभ्या राहत असल्याने देखील वाहतूक कोंडी होत असते.
आता दिवाळीची सुट्टी संपत आली आहे. आता श्रीवर्धनमध्ये सहलींच्या बसेस येणे सुरू होईल. या बसेस श्रीवर्धन शहराच्या प्रवेशद्वारापासून समुद्रकिनाऱ्याजवळ जाईपर्यंत संपूर्ण शहरातील रस्त्यांवरती वाहतूक कोंडी होते. कारण मोठमोठ्या बस असल्यामुळे समोरून एखादे छोटे वाहन आले तरी बस सावकाशपणे पुढे न्यावी लागते. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून अनेक शाळा व महाविद्यालयांच्या सहली श्रीवर्धन येथे येत असतात. त्यामध्ये काही खासगी लक्झरी बसेस असल्यानंतर त्या शहरातील रस्त्यावरून नेणे अशक्य असताना देखील सहली बरोबर आलेले शिक्षक या बस घेऊन समुद्रकिनाऱ्यापर्यंत येतात. श्रीवर्धन शहरात सुद्धा अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालवत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे. तरी श्रीवर्धन पोलिसांनी अल्पवयीन दुचाकी चालक आढळल्यास कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे नागरीकांमधून बोलले जात आहे.






