श्रीवर्धन शहरात वाहतूक कोंडी

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन समुद्रकिनारी अत्यंत सुंदर असे सुशोभीकरण केल्यामुळे या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यापासून राज्यातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहली काढण्यात येतात. विविध शाळा व महाविद्यालये आपल्या सहली श्रीवर्धन समुद्रकिनारी घेऊन येत असतात. सहलीसाठी आल्यानंतर निसर्गरम्य व स्वच्छ असा श्रीवर्धनचा समुद्रकिनारा, हरिहरेश्वर मंदिर व दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिर पाहण्यासाठी विविध शाळांच्या सहली या भागांमधून फिरत असतात.

मात्र श्रीवर्धन शहरातील रस्ते अरुंद असल्यामुळे सहलीच्या बसेस शहरात आल्यानंतर त्या समुद्रकिनाऱ्याकडे जात असताना अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. तसेच एखाद्या रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी त्यामुळे विलंब होतो.

सहलीसाठी एसटी. बसेस बरोबर अनेक वेळा खासगी लक्झरी बस देखील येतात. या बसेस लांबी व रुंदीने एसटी बसेस पेक्षा खूप मोठ्या असतात. दिवसाकाठी 25 ते 30 बसेस शहरात येत असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटता सुटत नाही.

तरी श्रीवर्धन पोलीस प्रशासनाने तसेच नगरपरिषद प्रशासनाने सहलीसाठी येणाऱ्या एसटी बसेस त्याचप्रमाणे लक्झरी बसेस श्रीवर्धन बस स्थानकात असलेल्या मोकळ्या जागेत उभ्या करून विद्यार्थ्यांना समुद्र किनारा पाहण्यासाठी पायी चालत जाण्याबाबत सूचना कराव्यात. जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल व नागरिकांना होणारा त्रास देखील वाचेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Exit mobile version