। पनवेल । वार्ताहर ।
आदई सर्कल येथे रस्त्यांवर अनधिकृत बसेस आणि मोठी वाहने पार्किंग होत असल्याने सकाळ-संध्याकाळी येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. अनधिकृत पार्किंगवर नित्याची कारवाई होत नसल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नवीन पनवेल शहरातील आदई सर्कलजवळील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर बेकायदा बसेस उभ्या असतात. रस्त्यावर बसेसची उभी लांब रांग लागते. या ठिकाणी रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. सुकापुरकडून पनवेलच्या दिशेने येताना रस्ता खराब आहे; मात्र, पालिका त्या रस्त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. येथील खड्डे बुजवले गेले नाहीत. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो आणि वाहतूक कोंडी होते. वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मुख्य गेटच्या बाजूला रस्त्यांवर बसेसची रांग लागते. तसेच, फूडच्यादेखील अनधिकृत गाड्या लागतात. यावर वाहतूक विभाग आणि पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करायला हवी. आदई सर्कलजवळील वाहतूक कोंडीतून वाहन काढताना कित्येकदा वाहने एकमेकांना घासली जातात. त्यातून वाद उद्भवतात. याबाबत वाहतूक पोलिसांना विचारले असता आम्ही येथील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करत असल्याचे सांगितले जाते.