अलिबाग-रोहा रस्त्यावर वाहतूक कोंडी

भर रस्त्यात ट्रक पडला बंद

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग-रोहा रस्त्यावरील आरसीएफ वसाहत कुरूळ नजीकच्या पुलावर रोहा बाजूकडे जाणारा ट्रक रस्त्यात बंद पडल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. बंद पडलेला ट्रक दुरुस्त करण्याचा प्रयत्न ट्रक चालकाने केला मात्र त्याला यश आले नाही. यामुळे रोहा, मुरुड बाजूने येणारी वाहने आणि अलिबागमधून रोहा मुरुडकडे जाणाऱ्या वाहनांच्या वेगाला ब्रेक लागला होता. तब्बल एक तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी कायम होती.

रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेतील पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी घटनास्थळी पोहचले होते. अलिबाग-रोहा रस्त्यावर असणाऱ्या पुलाच्याजवळ ट्रक बंद पडला. त्या ट्रक पाठोपाठ रसायन वाहून नेणारा टँकर असल्याने दोन्ही बाजूकडील वाहनांची ये-जा थांबली आहे. सायंकाळी साडेसात वाजल्यापासून वाहने रस्त्यात अडकली असल्याने कामावरून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये संताप पाहावयास मिळाला.

Exit mobile version