| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा बाजारपेठेत बेशिस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा लहान-मोठी वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी बाहेर पडणार्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
रेवदंडा बाजारपेठेत अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील नागरिक व रेवदंडा पंचक्रोशीतील लोक खरेदीसाठी येत असतात. बाजारपेठेतील अरूंद रस्त्यात मोटारसायकल, रिक्षा, मालवाहतूक टेम्पो, तसेच लहान-मोठी वाहने बेशिस्तपणे पार्किंग केली जातात, त्यामुळे बाजारपेठेतील अरूंद रस्त्याने जा-ये करणार्या मोठ्या बसेस, मालवाहतूक ट्रक यांना अडथळा निर्माण होतो, त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याने होते. मुख्य रस्ता अरूंद असल्याने पार्किंग समस्यासुद्धा निश्चितच जाणवते. बाजारपेठेतील अरूंद रस्त्यात पार्किंग सुविधा उपलब्ध होत नसल्याने बाजारपेठेत गर्दीच्या वेळी रस्त्यात वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
रेवदंडा गोळा स्टॉप ते रेवदंडा हायस्कूलदरम्यान नित्याने वाहतुक कोंडीची समस्या असते. विशेषतः केळकर स्टॉप, अर्बन बँक, पारनाका ते पुढे रेवदंडा हायस्कूलपर्यंत नित्याची वाहतूक कोंडी निर्माण होत असते. बाजारपेठेतील नित्याने होत असलेली वाहतूक कोंडी पोलिसांनासुद्धा डोकेदुखी ठरत आहे.