। अलिबाग । वार्ताहर ।
नुकत्याच पंजाब येथे झालेल्या गतका फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या मुलांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यात 2 सुवर्ण, 2 रौप्य व 3 कांस्य अशी एकूण 7 पदकं जिंकली आहेत.
अलिबाग तालुक्यातील रामनाथ येथील काजल पाटील व महाजने येथील श्रमिका पाटील या दोघी सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. तर, पेढांबे येथील जिज्ञासा पाटील हिने रौप्य आणि कांस्यपदक प्राप्त केल आहे. जिज्ञासा ही दुहेरी पदक मिळवणारी पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. तसेच, नाना पाटील हायस्कूल पेझारी शाळेची विद्यार्थीनी तन्मयी पाटील हिने अंतिम सामन्यात अतिशय चांगला खेळ करत रौप्य पदक प्राप्त केले आहे. तर, सारळ येथील मानसी पाटील हिने हरियाणाला पराभूत करत कांस्यपदक प्राप्त केले आहे. तसेच, अलिबाग कोळीवाड्यातील प्रणाली कांबळे हीदेखील कांस्यपदकाची मानकरी ठरली आहे.
यावेळी नवगाव येथील वेदिका कवळे आणि पंथ नगर येथील सोनू कामी यांनी अंतिम आठपर्यंत मजल मारली. या सर्व खेळाडूंची उत्तराखंड येथे होणार्या खेलो इंडिया स्पर्धेसाठीच्या सिलेक्शन ट्रायलसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच, अपूर्वा कोठारे, काव्या शेळके, श्रेयश चटियाल, खोपोलीतील आरुषी चौधरी, मालविका सुदेवान, स्वरा देशमुख, हर्षित गौड, अलिबागमधील रोहन गुरव, तनया मंचेकर, सेजल पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे.