अलिबाग-वडखळ रस्त्यावर वाहतूक कोंडी

20 मिनिटांच्या प्रवासासाठी दोन तासांचा खोळंबा
दिवसाची अवजड वाहतूक थांबवा: पंडित पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वडखळ-अलिबाग मार्गाचे धिंडवडे थांबायचे नाव घेत नाहीय. मोठ्या प्रमाणावरील अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्याचा त्रास या मार्गावरुन ये-जा करणार्‍यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी या मार्गावर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अलिबाग-वडखळ मार्गावरील 20 मीनीटांच्या प्रवासासाठी तब्ब्ल दोन तासांचा खोळंबा होत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान, माजी आमदार पंडित पाटील यांनी या रस्त्यावरील दिवसा होणारी अवजड वाहतूक थांबविण्याची अनेकदा केलेल्या मागणीबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासोबत संपर्क साधत त्वरित या प्रश्‍नाची सोडवणूक करण्याची मागणी केली.

अलिबाग-वडखळ रस्ता हा रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्र असलेल्या अलिबाग, मुरुडकडे जाण्यासाठीदेखील हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. याच मार्गावरुन अलिबाग, मुरुडकडे मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुुरु असते. अरुंद असलेल्या या रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी या रस्त्याबाबत अनेकदा आवाज उठवित प्रशासनाला सुनावले आहे. मात्र, कसलेही सोयरसुतक नसलेल्या प्रशासनाने याकडे नेहमीच सोयीस्करित्या दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली आहे. याच मार्गावरुन पर्यटक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद तसेच जिल्हा रुग्णालयात नागरिकांची नेहमी ये-जा केली जात असते.

त्यामुळे हा मार्ग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत पंडित पाटील वारंवार आवाज उठविल्यानंतर सदर रस्त्याची जेएसडब्ल्यूच्या माध्यमातून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, आजही या मार्गावर दिवस-रात्र अवजड वाहतूक सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारीदेखील या मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या. शुक्रवार, शनिवार सलग सुट्ट्या असल्याने पर्यटकांची अलिबाग, मुरुडकडे पावले वळत आहेत. त्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. अलिबाग-वडखळ हा 23 किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी पुरेसा असतो. मात्र, वाहतूक कोंडीमुळे या 20 मिनिटांच्या प्रवासासाठीत दोन तासांचा खोळंबा होत असल्याने पर्यटक आणि प्रवासी जनता प्रशासनाच्या नावाने खडे फोडत होती.

याच वाहतूक कोंडीत अडकलेल्या माजी आ. पंडित पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी संपर्क साधत नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी या मार्गावरील दिवसा होणारी अवजड वाहतूक थांबविण्याची मागणी केली.

अवजड वाहतुकीबाबत वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा करुन आवश्यक त्या उपाययोजनांबाबत आराखडा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. गॅस वापराची अवजड वाहनं जीवनावश्यक वाहतुकीमध्ये येत असल्याने याबाबत सखोल अभ्यास करुन मार्ग काढण्यात येईल. – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक

Exit mobile version