सलगच्या सुट्यांमुळे महामार्ग फुल्ल
| माणगाव | प्रतिनिधी |
होळीच्या निमित्ताने कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
होळी उत्सवात नागरिक कोकण व तळ कोकणातील आपल्या मूळगावी होळी साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जातात. यंदाचे वर्षीही या होळी उत्सवात चार दिवस सलग सुट्या आल्याने नागरिक मिळेल त्या वाहनांनी कोकण व तळ कोकणात निघाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाचे वर्षीही माणगाव बाजारपेठेत प्रवासी नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला आहे. मुंबई माणगावकडे येताना सुमारे 3 किमी अंतरावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच पुणे बाजूकडून येणार्या पर्यटक प्रवाशांच्या वाहनांचे रांगा सुमारे दीड किमी अंतरावर लागल्या होत्या, त्यामुळे वाहतूक कोंडीशी सामना प्रवासी नागरिकांना करावा लागला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना पाण्यासाठी हाल झाले, त्यामुळे होळी उत्सवावर वाहतूक कोंडीचे पाणीच पडले. त्यामुळे कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे बाजूकडून समुद्र व पर्यटन स्थळावर मौज मजा करण्यासाठी आपल्या कुटुंब व मित्रासह ग्रुप वर्षा सहलीसाठी मोठ्या प्रमाणांत आले आहेत. त्यामुळे सर्वांनाच या वाहतुक कोंडीचा फटका बसला. हि वाहतूक सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच महामार्ग पोलीस व माणगाव पोलीस विशेष प्रयत्न करीत आहेत.
रखडलेल्या कामाचा फटका
माणगाव व इंदापूर येथील मुख्य बाजारपेठेतून जाणार्या रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या दोन्ही बाजारपेठेला बायपास काढण्याचे काम गेले अनेक वर्षापासून सुरु असून ते काम रखडत चालल्यामुळे नागरिकांना नाहक फटका बसत आहे. बायपासचे काम पूर्ण झाल्यास माणगावमध्ये होणार्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी आशा नागरिकांना आहे.