मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

लग्नसराई, सलग सुट्ट्यांचा परिणाम

| खांब-रोहा | वार्ताहर |

सध्या सुरू असलेली लगीनसराईची धामधूम व मे महिन्याच्या सुट्टीमुळे वाहतूक कोंडी होऊ लागल्याने महामर्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.

महामार्गाचे संथ गतीने चालू असलेल्या रुंदीकरणाच्या बांधकामामुळे प्रवासाला होत असलेला विलंब व त्यात भरीस भर म्हणून कुठे ना कुठे घडणारे अपघात यामुळे महामार्गावरील प्रवास नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. सध्या शाळा व कॉलेजला पडलेल्या सुट्ट्यांमुळे व सर्वत्र एकच लगीनसराईची धामधूम सुरू असल्याने मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत एकाकी वाढ झाली आहे. परिणामी, महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. मुलांना सुट्ट्या असल्याने गोवा व तळ कोकणात जाणारे पर्यटक व गावी जाणारे चाकरमानी यांची वाहनेही महामार्गावर मोठ्या संख्येने वाढल्याने मोक्याच्या ठिकाणांजवळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यातच महामार्गावर वाहतूक करणारी अवजड वाहने वाहतूक कोंडीत आणखी भर घालत असल्याने त्यांचीही डोकेदुखी वाढली आहे.

दिवसेंदिवस तापमानाचा पारा अधिकाधिक चढत चालला असल्याने प्रत्येकाचा जीव अगदी कासावीस होत आहे. त्यातच वाहतूक कोंडीने वाहने जास्त वेळ एकाच जागेवर तासन्‌‍तास ताटकळत राहावे लागत असल्याने प्रवासी व वाहनचालकांनाही मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

Exit mobile version