सलग सुट्ट्यांनी ‘एक्स्प्रेस-वे’ हाऊसफुल्ल

। खोपोली । प्रतिनिधी ।
स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुण्याचे पर्यटक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. याचा परिणाम ‘एक्स्प्रेस वे’वर झाल्याचे शनिवारी दिसून आले. यावेळी महामार्गावर दोन्ही बाजुंकडून लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.

शनिवार, रविवारनंतर सोमवार आणि मंगळवारीदेखील सुट्टी जोडून आल्याने अनेकांनी पर्यटनस्थळी, गावाकडे जाण्यास पसंती दिली. शनिवारी सकाळपासून मुंबई बाहेर जाणार्‍या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. सकाळी वाशी टोलनाक्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

खालापूर टोलनजीक सुमारे दोन ते अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोणावळा, पुणे, सातार्‍यातील पर्यटनस्थळावर जाण्यासाठी अनेकांनी पसंती दिली. त्यामुळे सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास लोणावळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पुण्याला जाणार्‍या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी लोणावळा बोगद्यातून मुंबईला जाणार्‍या मार्गिकेवरून काही वेळेसाठी वाहतूक वळवली. परिणामी, लोणावळ्याजवळ वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे.

खालापूर टोलनाक्यावर एरव्ही पुण्याकडे जाणार्‍या वाहनांची गर्दी असते; मात्र शनिवारी सकाळी मुंबईच्या दिशेली मोठी रांग होती. दुपारनंतर पुण्याच्या दिशेला गर्दी वाढली तर शेंडूग टोलनाक्यावर पुण्याच्या दिशेला वाहनांचा गर्दी होती. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. वसईहून ठाणे, मुंबईकडे जाणारी वाहतूक, मुंबईहून गुजरात, ठाणेकडे जाणार्‍या मार्गिकेवर सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांब वाहानांची रांग लागल्याचे चित्र सकाळी दिसून आले.

टोल दरातही वाढ
एक्सप्रेस वेच्या टोल दरात एप्रिलमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे कार किंवा जीप, मिनी बस, मोठ्या लक्झरी बस या सर्व प्रकारच्या वाहनांचे टोल दर हे 40 ते 122 रुपयांनी वाढवण्यात आले. तसेच ‘एक्सप्रेस वे’वर वाहतुकोंडी होत नसल्यामुळे वाहनचालक वाढीव टोल भरून प्रवास करीत आहेत. एनएच 4 व जुन्या महामार्गावर टोल कमी असल्यामुळे बहुसंख्य वाहने या मार्गावरून प्रवास करीत असल्यामुळे पळस्पे फाटा तसेच शेंडूंग टोलनाक्यावर वाहनांची रांग लागली आहे.

Exit mobile version