साळाव पुलावर वाहतूक कोंडी

। कोर्लई । वार्ताहर ।

अलिबाग-मुरुड व रोहा या तीन तालुक्यांना जोडणारा दुवा असलेल्या साळाव पुलावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने येणार्‍या पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. येथूनच हाकेच्या अंतरावर असलेला चेक पोस्ट आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यात पोलीसांचे सहकार्य अपेक्षित असते. परंतु, तेच वाहतूक पोलीस झाडाखाली खुर्च्या टाकून बसल्याचे चित्र निदर्शनास आले.

मुरुड, रोहा व अलिबाग यांना जोडणारा एकमेव मोठा दुवा साळावपूल आहे. या पूलाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एकतर्फी वाहतूक करावी लागत आहे. मुरुड-जंजिरा किल्ला पाहण्यासाठीचा शेवटचा आठवडा असल्यामुळे तसेच, सुट्ट्या संपत असल्यामुळे येथील वाहतूक वाढली आहे. गुरुवार असून देखील मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ वाढली होती. या होणार्‍या वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसांनी नियंत्रण करणे गरजेचे होते. जेणेकरून वाहन चालकांना व प्रवाशांना त्रास होणार नाही. परंतु, या पुलापासून चेक पोस्टजवळ असलेल्या झाडाखाली वाहतूक पोलीस आरामात खुर्च्या टाकून बसले असल्याचे चित्र निदर्शनास आले.

Exit mobile version