बोटीच्या कामासाठी पुलावर क्रेन आडवी
पर्यटक, प्रवासी वाहतूक, विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका
| मुरूड | प्रतिनिधी |
मुरूड एकदरा पुलावर तब्बल दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. मच्छिमार बोटीच्या इंजिनचे काम करण्यासाठी पुलावर क्रेन आडवी लावून दोन्ही बाजूंनी होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. पर्यटक, प्रवासी वाहतूक, शाळकरी मुले, स्थानिक वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागला. या कामासाठी कोणतीही परवानगी न घेता वाहतूक कोंडी करून काम सुरू होते.
मुरूडला जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढत चालली आहे. त्यात शनिवार असल्यामुळे पर्यटकांची रहदारी होती. शाळेतील मुलांच्या बसेससुद्धा आल्या होत्या, मुरूड बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या डोंगरी, राजपुरी, माझेरी, आगरदांडा परिसरातील ग्रामस्थांच्या वाहनांची वर्दळ होती. आणि अचानक एकदरा पुलावर क्रेन आडवी लावून बोटीचे इंजिनचे काम सुरू केले होते. तब्बल दोन तास हे काम सुरू होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. दुपारची वेळ असल्याने अंगाची लाही लाही झाली होती. ही वाहतूक कोंडी का होतेय हे पाहण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने एकदरा पूल गाठला व सदर क्रेन चालकाला पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी परवानगी घेतली आहे का, असा प्रश्न केला. तर त्याने सांगितले परवानगी घेतली नाही. या वाहतूक कोंडीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.