पार्किंगच्या असुविधेमुळे बसतोय फटका
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा बाजारपेठेत बेशिस्तीने केलेल्या लहान-मोठ्या वाहनांच्या पार्किंगमुळे नित्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे पार्किंगच्या असुविधेमुळे बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या ऐरणीवर आली आहे.
अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्याला रेवदंडा हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथून वाहनांची जा-ये मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः मुरूड तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून प्रसिध्दीस असल्याने येथून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात, त्यांना रेवदंडा मार्गेच मुरूडकडे जा-ये करावी लागते. रेवदंडा बाजारपेठ सुमारे दोन कि.मी. अंतरामध्ये वसलेली आहे. या बाजारपेठेतील रस्ता अत्यंत अरूंद आहे. त्यामुळे वाढत्या वाहतुकीचा ताण रस्त्याला नेहमीच बसतो. दरम्यान, परिसरात कुठेही पार्किंग सुविधा नसल्याने जा-ये करणाऱ्या वाहनांना बाजारपेठेत बेशिस्तीने पार्किंग केलेल्या वाहनांचा अडथळा होतो व वाहतूक कोंडी निर्माण होते.
रेवदंडा बाजारपेठेतील अरूंद रस्त्यामुळे दोन मोठी वाहने पास होताना फारच जिकिरीचे असते, शिवाय रस्त्यात उभी केलेली लहान मोठी वाहने वाहनांच्या जा-ये करताना अडथळा निर्माण करतात. रेवदंडा गोळा स्टॉप ते रेवदंडा हायस्कूलदरम्यान नित्याने वाहतूक कोंडीची समस्या असते. विशेषतः केळकर स्टॉप, अर्बन बँक, पारनाका ते पुढे रेवदंडा हायस्कूलपर्यंत नित्याची वाहतूक कोंडी निर्माण होत असते. ही वाहतूक कोंडी पोलिसांनासुद्धा डोकेदुखी ठरत आहे. तरी याप्रश्नी संबंधितांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.