एकसल पुलावरील वाहतूक बनली धोकादायक

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीमधील चिंचवली ते एकसल रस्त्यावर असलेल्या नाल्यावर मोठा पूल आहे. त्या पुलाची उंची भरपूर असून एखादे वाहन त्या पुलावर खाली कोसळले तर ते वाहन किमान 30 फूट खोल जाऊन पडेल. त्याच पुलाच्या संरक्षण कठडे अनेक वर्षे गायब आहेत. दरम्यान, पुलावरून रात्रीच्या वेळी वाहन खाली कोसळण्याची भीती असून स्थानिकांनी पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

एकसल गावाच्या प्रवेशद्वाराच्या अगोदरच एक ओहळ आहे. ओहळावर असलेल्या पुलाला संरक्षण कठडे राहिले नसल्यामुळे वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. रात्री अपरात्री एखादे वाहन ओहळात जाऊ शकते. दोन्ही बाजूला कठडे राहिले नाहीत. त्यात ओहळाची उंची 25 ते 30 फूट आहे. संबंधित पुलाच्या दोन्ही बाजूंचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण मागील वर्षभरात सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. या पुलाच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करून संरक्षण कठडे उभारण्यात यावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ सातत्याने करीत आहेत. मात्र, बांधकाम विभागाकडून कोणतीही कामे त्या ठिकाणी केली जात नाहीत. पुलाच्या एकसल भागाकडील बाजूस वळण असून रस्त्याची माहिती नसलेले वाहनचालक त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघातग्रस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती करण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. रस्त्याचे बांधकाम करताना पुलाचे संरक्षण कठडे बसवून घेण्याची गरज होती. मात्र बांधकाम विभाग अपघात होऊन लोकांचे जीव जाण्याची वाट बघत आहे काय? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

Exit mobile version