चार कोटींची तरतूद
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील चिंचवली-चांदई-कडाव-तांबस-जांभिवली-दहिवली या राज्यमार्गावर उल्हासनदीवर तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालय येथे असलेला पूल अरुंद आहे. त्यामुळे तेथे आणखी एक पूल बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
कर्जत तालुक्यात असलेल्या रस्त्यांचे काही वर्षांपूर्वी अपग्रेडेशन करण्यात आले. त्यात चिंचवली-कडाव-जांभिवली-दहिवली या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा देण्यात आला. त्या रस्त्यावर तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला बांधण्यात आलेला पुलाची रुंदी जेमतेम एक वाहन जाईल एवढीच होती. त्यामुळे एका बाजूने वाहन जात असताना दुसर्या बाजूने आलेल्या वाहनाला पुलाच्या दुसर्या कोपर्यावर ते वाहन पूल ओलांडे पर्यंत थांबून राहावे लागत होते. त्यामुळे या रस्त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यमार्गात रूपातर केल्यानंतर उल्हास नदीवरील पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्याची मागणी जोर धरत होती. आ.थोरवे यांनी तासगावकर महाविद्यालय येथील नवीन पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन पूल मंजूर करून आणला आहे. बांधकाम खात्याने त्या पुलासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.