अवजड वाहनांवर वाहतूक पोलिसांचा दणका

दोन महिन्यांत 4 हजार 41 वाहनांवर कारवाई; कर्णकर्कश सायलेन्सरही केले जप्त

| पनवेल विशेष | प्रतिनिधी |

कळंबोली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या जड-अवजड वाहनांना आळा घालण्यासाठी कळंबोली वाहतूक शाखेने कारवाईचा धडाका लावला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026 या दोन महिन्यांत तब्बल 4 हजार 41 जड-अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुमार प्रल्हाद सरतापे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

कळंबोली, खांदा कॉलनी आणि कामोठे परिसरात रस्त्यांच्या कडेला तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. अशा वाहनांमुळे अनेकदा गंभीर अपघातही घडले आहेत. नुकत्याच नांदगाव परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आजोबा आणि नातीचा मृत्यू झाला, तर अन्य चौघे जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जड-अवजड वाहनांवरील कारवाईबरोबरच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 29 मोटारसायकलींवर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 24 चालकांवर, हेल्मेट न वापरणाऱ्या 2 हजार 259 दुचाकीस्वारांवर, सीट बेल्ट न लावणाऱ्या 474 वाहनचालकांवर, सिग्नल तोडणाऱ्या 1 हजार 280 वाहनचालकांवर, तर भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या 247 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय अन्य 2 हजार 689 प्रकरणांमध्येही दंडात्मक कारवाई करण्यात आली. केवळ दंडात्मक कारवाई न करता नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यावरही वाहतूक शाखेने भर दिला आहे. विविध प्रबोधन कार्यक्रमांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ आणि छायाचित्रांद्वारे जनजागृती केली जात आहे. सन 2026 मध्ये 1 हजार 480 खटले न्यायालयात पाठवून त्यांची निर्गती करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरतापे यांनी दिली.

विशेष पथके तैनात
दिवाळी सणाच्या काळातही वाहतूक शाखेने नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवला होता. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तसेच गोवा महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी पाच पोलीस कर्मचारी आणि एका पोलीस उपनिरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. खांदा कॉलनी, रोडपाली, कळंबोली सर्कल आणि कामोठे जंक्शन येथे विशेष बंदोबस्त ठेवल्यामुळे सणासुदीच्या काळात मोठ्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यात यश आल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
Exit mobile version