| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर शहरातून सीबीडी-बेलापूर तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांकडून हिरानंदानी पुलाखाली सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी वाहतूक पोलिसांची चौकी आणि कर्मचारी उपस्थित असतानाही नियमबाह्य पद्धतीने वाहने चालविली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
खारघरहून सीबीडी-बेलापूर आणि मुंबईच्या दिशेने जाताना वाहनचालकांनी हिरानंदानी पुलाखालून वळसा घालून सर्कलला योग्य पद्धतीने वळसा घेत नियोजित मार्गाने पुढे जाणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून सर्कलला वळसा न घालता थेट विरुद्ध दिशेने वाहने घेऊन जातात. तर काही वाहनचालक पुढे जाणाऱ्या वाहनांच्या रांगेत घुसखोरी करून वाहतुकीचा मार्ग अडवितात.
शॉर्टकटच्या नादात चुकीच्या दिशेने वाहने चालविल्यामुळे पुलाखाली वाहनांची गर्दी वाढून वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच काही वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहने चालवत असल्याने इतर वाहनचालकांना अडथळा निर्माण होतो. परिणामी अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
विशेष म्हणजे, हिरानंदानी पुलाखालीच वाहतूक पोलिसांची चौकी असूनही नियमांचे उल्लंघन होत असल्याने वाहतूक शिस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर प्रभावी कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी सर्कलला योग्य पद्धतीने वळसा घालून नियोजित मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी नियमित लक्ष ठेवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
हिरानंदानी पुलाखाली वाहतूक नियमांचे तीनतेरा
