वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग

जी.एम.मुजावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक

| उरण | वार्ताहर |

वाहतूक सुरक्षेबाबत आपल्याकडे चांगले नियम आहेत; पण ते पाळले जात नाहीत हेच दुर्दैव आहे. वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग आहे, त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी आता सर्वांनी आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे, असे मत न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी.एम.मुजावर यांनी व्यक्त केले.

उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम वाजेकर विद्यालय, फुंडे गाव येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम या दृष्टीने मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लहान मुलांनी कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना वाहन न चालवण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांनी स्वतः व त्यांचे पालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विनापरवाना वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर न बोलणे, सिग्नल नियमांचे पालन करणे, रस्ता ओलांडताना योग्य खबरदारी घेणे, स्कूल बस व रिक्षामधून प्रवास करताना योग्य ती दक्षता घेणे, रस्त्यावरील सूचना फलकावरील सूचनांचे पालन करावे याबाबत न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर, पोलीस अंमलदार मेटे, पोलीस अंमलदार ठोके, प्राचार्य एम.जी. म्हात्रे, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version