उरणमध्ये पावसामुळे वाहतूक मंदावली

| उरण । वार्ताहर ।

पावसामुळे उरण, पनवेल, नवघर पूल, फुंडे ते जेएनपीटी तसेच उरण शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. या मार्गावरील वाहनांना रस्त्यावरील पाण्याचा अंदाज घेत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे उरण पनवेल मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

सोमवारी रात्रीपासून संततधार व मध्ये मध्ये वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जेएनपीटीच्या चौथ्या बंदराला जोडणार्‍या न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या उड्डाणपुलाखाली काही प्रमाणात पाणी साचले होते. त्याचप्रमाणे जेएनपीटी कामगार वसाहत ते फुंडे दरम्यानच्या मार्गावरही पाणी साचून एका बाजूने दुसर्‍या बाजूला वाहत होते. उरण पनवेल मार्गावरील बोकडविरा गाव, वायू विद्युत प्रकल्प, कामगार वसाहत, सिडको कार्यालय, वीर वाजेकर महाविद्यालय तसेच नवघर फाटाजवळील रस्त्यावर पाणी भरले होते. या पावसामुळे उरण शहरातीलही नागरिकांची वर्दळ कमी झाली होती.

Exit mobile version