| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खांडस गावाजवळ रविवारी (दि.5) सकाळच्या सुमारास एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. या घटनेमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
झाड रस्त्यावर पडल्यामुळे अवजड वाहने तसेच चारचाकी वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद झाली असून, या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पुढे जाता येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दुचाकीस्वार मात्र बाजूच्या अरुंद मार्गाचा वापर करून प्रवास करत असल्याचे दिसून आले. खांडसवरून आंबेरपाडा व काठेवाडी या गावांकडे जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.
सध्या नांदगावमार्गे आंबेरपाडा व काठेवाडी असा वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांचा वेळ व खर्च दोन्ही वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने झाड हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
