राज्यात 215 आगारातून वाहतूक सुरु

। मुंबई । प्रतिनिधी ।
एसटी संपाच्या पार्श्‍वभूमीवर परिवहन मंत्री ड. अनिल परब यांनी कर्मचार्‍यांना सेवेत रुजू होण्याच्या केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 26 हजार 500 पर्यंत कामगार रुजू झाले असून 215 आगारांतून 2,382 बसेस रस्त्यावर धावल्या. सुमारे 7,138 फेर्‍यांमधून सुमारे 4 लाख प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

संपाच्या पाश्‍वर्र्भूमीवर प्रवाशांना वाहतुकीची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी एसटीचे सेवानिवृत्त व कंत्राटी पद्धतीवर चालक नेमण्यात आले आहेत. दरम्यान, संपामुळे एसटी महामंडळाला सुमारे 1200 कोटींचा तोटा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचार्‍यांना सेवेत रुजू होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनामुळे आशादायक चित्र निर्माण झाले असून रोज सुमारे 400 कर्मचारी कामावर रुजू होत आहेत.

कामगारांमधील सकारात्मक बदलामुळे कामावर रुजू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यभरातील 250 आगारांपैकी 215 आगारांतून वाहतूक सुरू झाली आहे. कामावर रुजू होण्याबाबत कामगारांकडून विचारणा केली जात असून, कर्तव्यावर येणार्‍या कर्मचार्‍यांना संरक्षण दिले जात असल्याचेही चन्ने यांनी सांगितले.

एसटीचे अध्यक्ष अनिल परब, तसेच एसटी महामंडळ प्रशासनाकडून कामावर हजर राहण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला न जुमानता संपात सहभागी झालेल्यांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवासमाप्ती करण्यात आली असून 3,123 कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जास्तीत जास्त नागरिकांना पूर्वीप्रमाणे वाहतुकीची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सर्व कामगारांनी कर्तव्यावर रुजू व्हावे. रुजू झाल्यानंतर चर्चेतून मार्ग काढला जाईल.

शेखर चन्ने, उपाध्यक्ष,एसटी


Exit mobile version