कोकणात जायचंय..तर नक्की वाचा नाहीतर तुमचं पेट्रोल जाईल वाया

महाबळेश्‍वरमधून पसरणी घाटमार्गे कोकणात जाणारी वाहतूक आज दिवसभर बंद
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
वाईहून पाचगणी, महाबळेश्‍वरकडे व कोकणात जाणार्‍या पसरणी घाटात दुरुस्तीचं काम सुरु आहे. या कामामुळे बुधवारी (दि.30) वाहतुकीसाठी घाटातील रास्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. येथील वाहतूक पाचवड, कुडाळ व नागेवाडी (वाई) मार्गाने वळविण्यात आली आहे. घाटात दिवसभर दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे.

पसरणी घाटामधील मोर्‍या व संरक्षक भिंती सततच्या पावसामुळे पडलेल्या आहेत. त्यामुळे सदरचा रस्ता वाहतुकीस धोकादायक झालेला असल्याने त्याची दुरुस्ती करण्याचे काम प्रगतीपथात आहे. हा रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यासाठी मोरीचे बांधकाम व संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी आज सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत एका दिवसासाठी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मोठमोठ्या यंत्रसामुग्री वापरून ही दुरुस्ती सुरु असल्याची माहिती उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी दिली.

या मार्गावरून पाचगणी महाबळेश्‍वर व कोकणात मध्यम मार्ग म्हणून मोठी वाहतूक असते. पसरणी घाट दुरुस्तीमुळे सुरुर, वाई, पसरणी, पाचगणी, महाबळेश्‍वर, पोलादपूर या भागातील वाहतूक दिवसभर बंद राहणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. घाट दुरुस्तीमुळे वाई येथे रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version