जनावरांची तस्करी; दामत येथील तरुणाला अटक

Yellow crime scene do not cross barrier tape in front of defocused background. Horizontal composition with selective focus and copy space.

चालकासह दोघांना पोलीस कोठडी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत-कल्याण रस्त्यावर नेरळ पोलिसांनी तीन गोवंशीय जनावरांना घेवून जाणारा टेम्पो पकडला होता. त्यावेळी टेम्पो चालकाला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यानंतर गुरांची विक्री ज्याच्याकडे केली जाणार होती, त्या तरुणाला नेरळ पोलिसांनी अटक केली असून, ही गुरे विक्रीसाठी पाठवणाऱ्या खालापूर हाळ येथील तरुणाचा शोध नेरळ पोलीस घेत आहेत.

दि.5 रोजी रात्री अकरा वाजणाऱ्या सुमारास कर्जत कल्याण रस्त्याने (एमएच-06-बीजी-4974) बोलेरो पिकअप गाडी पकडून गोवंशीय जनावरांची बेकायदा वाहतूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. बोलेरो टेम्पोमध्ये तीन गोवंशीय जनावरे यांना कोंबून त्यांची बेकायदा वाहतूक केली जात होती. पोलिसांनी ही जनावरे ताब्यात घेऊन नेरळजवळील कोंबलवाडी येथे असलेल्या गोशाळेत दाखल केली. तर, टेम्पो ताब्यात घेत, चालक स्वप्नील सुरेश गायकवाड, रा. नारंगी, ता. खालापूर या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी टेम्पो चालक स्वप्नील गायकवाड आपल्या पोलीस अधिकाऱ्यांसह चौकशी केली असता टेम्पोमधील जनावरे दामत येथील अल्ताफ नजे याने मागवून घेतली होती. त्याचे सर्व मोबाईल कॉल तपासून पाहिल्यानंतर नेरळ पोलिसांनी दामत येथून अल्ताफ नजे यास अटक केली. त्या दोघांना नेरळ पोलीस यांनी कर्जत न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्या जनावरांची विक्री करणाऱ्या खालापूर तालुक्यातील हाळ गावातील तरुणाचा शोध घेण्यासाठी नेरळ पोलिसांचे पथक खालापूर येथे गेले होते, मात्र तो तरुण सापडला नाही, अशी माहिती नेरळ पोलिसांनी दिली आहे. नेरळ पोलिस ठाण्यात या दोन्ही तरुणांवर गुन्हा दाखल असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर करीत आहेत.

Exit mobile version