देवदर्शनासाठी गेलेल्या पाच जणांचा अपघाती मृत्यू
। पनवेल । वार्ताहर ।
पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळजवळ देवडी पाटीजवळ शनिवारी (दि.17) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. पनवेल येथून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेली एरटीका कार या वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळून अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला जखमी आहे.
अपघातग्रस्त कारमध्ये एकूण सहा प्रवासी (तीन पुरुष व तीन महिला) होते. सर्व प्रवासी एकमेकांचे मित्र असल्याचे समजते. अपघातात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, ज्योती जयदास टाकले, रा. सेक्टर 7, पनवेल, जि. रायगड या महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. जखमी महिलेस तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. माला रवी साळवे (40) राहणार पनवेल, अर्चना भंडारे (47) पनवेल वेस्ट, विशाल भोसले (41) राहणार पनवेल स्टेशन जवळ पनवेल, अमर पाटील, खारघर आणि आनंद माळी असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.







