आंबेपूरच्या नयन पाटील यांचे अपघाती निधन
| पेझारी | प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील पेझारी-आंबेपूर येथील नयन नंदकुमार पाटील (28) यांचे मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात दुःखद निधन झाले. वडखळ-अलिबाग मार्गावरील संजीवनी हॉस्पिटलसमोर हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मैत्रीदिनानिमित्त नयन पाटील आपल्या मित्रांसह मुंबईला गेला होता. तेथून परत येत असताना पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ब्रेझा कार आणि ट्रेलरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात नयन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. नयन पाटील हे आंबेपूर परिसरातील अत्यंत गुणी, मनमिळावू व सुस्वभावी युवक म्हणून परिचित होते. शिवभक्त म्हणून त्यांची विशेष ओळख होती. ते ढोलपाडा, आंबेपूर येथील शिवभक्त जयकुमार पाटील यांचे पुतणे होते. त्यांच्या अकाली निधनाची वार्ता सकाळी गावात पोहोचताच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. दुपारी एक वाजता आंबेपूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक बहीण, काका तसेच मोठा परिवार आहे. दरम्यान, या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अपघातातील ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
