किल्ले रायगडावरील पायवाट बंद- जिल्हाधिकारी किशन जावळे

| रायगड । प्रतिनिधी ।

रायगड किल्ल्यावर महादरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरील मोकळे दगड काढून घेण्याकरीता दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांनी सहमती दर्शविली असून हे काम तातडीने करण्यात येणार आहे. याकरिता किल्ले रायगडावर जाणार्‍या पायरीमार्गावर संभाव्य दरड आपत्ती सौम्यीकरण उपाययोजनांच्या अनुषंगाने (दि.23) व (दि.24) मे रोजी किल्ले रायगडावरील पायवाट बंदचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.

किल्ले रायगडावर यावर्षी 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार (दि.06) जून व तिथीनुसार (दि.20) जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याकरीता नागरिक आणि अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या कार्यक्रमाच्या अगोदर महादरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरील मोकळे दगड काढून घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी असलेला कडा हा अतिउंच असल्याने केवळ प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने मोकळे दगड काढणे शक्य आहे. हे मोकळे दगड काढीत असताना पायरी मार्गावरून होणार्‍या पर्यटकांची पायी वाटचाल बंद करणे आवश्यक आहे. जेणेकरून या ठिकाणी कोणतीही जीवितहानी होणार नाही. या कालावधीत पर्यटक, स्थानिक नागरिक पायवाटेने गड चढ-उतार होणार नाहीत याबाबत स्थानिक प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

Exit mobile version