। पाली । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासनाचा दि. 31 ऑगस्ट रोजी कामोठे येथील सिडको समाज केंद्रामध्ये 21 वी पशुगणना प्रशिक्षण कार्यक्रम तसेच प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हा कार्यक्रम पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे, महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मधुलिका लाड, सहायक आयुक्त डॉ. रत्नाकर काळे, सहायक आयुक्त डॉ. अजय कांबळे, डॉ. राजेश लाळगे, डॉ. सोमनाथ भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे म्हणाले, प्रगणकांनी प्रत्येक घरी जाऊन प्रामाणिकपणे माहिती गोळा करायची आहे. ही माहिती पुढे पर्यवेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. या गणनेतून मिळालेल्या माहितीनुसार, पशुसंवर्धन विभागाला निष्कर्ष काढून पुढील धोरणे ठरवावी लागतात. त्यामुळे ऑथेंटिक माहिती प्रगणकांनी देणे गरजेचे आहे. तर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे म्हणाले, पाच वर्षांतून करण्यात येणारी यावर्षीची पशुगणना सप्टेंबर महिन्यात सुरू करून डिसेंबर महिन्यापर्यंत करण्यात येणार आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार्या या पशुगणनेतून आपल्या राज्यात किती पशुधन आहे हे कळणार आहे. यासाठी प्रगणकांनी अचूक पशुगणना करणे अपेक्षित आहे. यावेळी डॉ. राजेश लाळगे व डॉ. सोमनाथ भोजने यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांना पशुगणना करताना कोणत्या पाळीव प्राण्याची गणना करायची, कशा पद्धतीने करायची, कामाचे स्वरूप, या पशुगणनेचा उद्देश, अशा विविध घटकांची माहिती आपल्या मार्गदर्शन सत्रांमध्ये दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमास सुमारे 100 प्रगणक व पर्यवेक्षक उपस्थित होते.